‘हा’ वकील लढणार एकनाथ शिंदेंची कायदेशीर लढाई; एका दिवसाची फी 25 ते 30 लाखांच्या घरात!
मुंबई – राज्यातील राजकारणात सध्या अनेक मोठमोठ्या घडामोडी घडताना दिसून येत आहेत. एकीकडे एकनाथ शिंदे ४० आमदार स्वतःसोबत असल्याचा दावा करत आहेत तर दुसरीकडे महाविकास आघाडीची चांगलीच गोची झाल्याचं पाहायला मिळतंय. महाराष्ट्रात सुरु असलेल्या सत्ता संघर्षाचा आता नवीन अंक सुरू झाला आहे असं म्हणता येईल.
दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी दिलेल्या आव्हानाला प्रत्त्युत्तर म्हणून शिवसनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यामुळे आता खऱ्या अर्थ्याने कायदेशीर लढाई सुरु झाल्याचं चित्र आहे. महत्वाचं म्हणजे या कायदेशीर लढाईमध्ये ख्यातनाम वकील हरीश साळवे हे शिंदेंची बाजू लढणार आहे. तर महाविकास आघाडीच्या वतीने कपिल सिब्बल आणि मनु सिंघवी बाजू लढवणार आहे.
एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला आव्हान देत थेट सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली आहे. शिंदे गटाच्यावतीने 15 आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेत दोन गोष्टींचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे. एक तर आमदारांनी उपाध्यक्षांना बेकायदेशीर ठरवून आमदारांना अपात्र ठरविण्याच्या नोटिशीला आव्हान दिले आहे आणि दुसरे म्हणजे त्यांनी स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला न्यायालयाकडून संरक्षण देण्याची मागणी केली आहे.
शिंदे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील हरीश साळवे आज सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडणार आहेत. त्याचवेळी शिवसेनेच्या वतीने ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी युक्तिवाद करणार आहेत. महाराष्ट्र सरकारच्या वतीने देवदत्त कामत लढणार आहेत तर उपाध्यक्षांसाठी अधिवक्ता रविशंकर जंध्याला लढणार आहेत. आमदारांच्या वतीने दोन याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.
कोण आहे हरीश साळवे?
हरीश साळवे यांचे नाव केवळ देशातच नाही तर जगातील सर्वात मोठ्या वकिलांमध्ये घेतले जाते. काही अहवालांनुसार त्यांचे एका दिवसाचे कामाचे शुल्क हे 30 लाखांच्या घरात आहे. गेल्या वर्षी हरीश साळवे यांनी कुलभूषण जाधव यांच्यासाठी वकिली केली होती. या प्रकरणात त्यांनी फक्त 1 रुपया फी घेतली होती. पण इतर वेळेस ते फक्त बड्या केसेसच घेतात आणि त्यात ते प्रत्येक तासाला काही लाख तर एका दिवसांसाठी 25 ते 30 लाख रूपये घेत असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच त्यांच्या फीवरून कळून जाईल की साळवे हे किती मौल्यवान वकील आहेत.
याआधी सलमान खान, मुकेश अंबानी, इटली सरकार आणि वोडाफोन सारख्या क्षेत्रातील बड्या लोकांसाठी काम केले आहे. धुळे जिल्ह्यातील वरुड गावाता जन्म झालेल्या हरीश साळवे यांनी नागपूर विद्यापीठातून एलएलबीचे शिक्षण घेतले. साधारण 1980 मध्ये त्यांनी वकिलीला सुरुवात केली. 1992 या वर्षात हरीश साळवे यांची दिल्ली उच्च न्यायालयात ज्येष्ठ वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली. १९९९ ते २००२ पर्यंत ते देशाला सॉलिसिटर जनरल म्हणून काम पाहत होते.
हरीश साळवे यांचे आजोबा पी.के.साळवे प्रसिद्ध क्रिमिनल लॉयर होते. तर पणजोबा हे न्यायाधीश होते. हरीश साळवेंच्या वडील एन.के.पी.साळवे हे कॉग्रेसचे नेते होते. हरीश साळवे यांचं नागपूरमध्ये घर आहे आणि धुळ्याशीही त्यांचा संबंध आहे. ते फक्त सुप्रीम कोर्टातच नाही तर वेगवेगळ्या खटल्यांमध्ये हायकोर्टापासून ते आंतरराष्ट्रीय कोर्टापर्यंत सगळ्या ठिकाणी बाजू मांडत असतात.


0 Comments