सदाभाऊ खोत यांच्यावर धावले राष्ट्रवादी कार्यकर्ते !
सोलापूर : रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर आज राष्ट्रवादीचे कार्यकर्ते धावून गेले आणि अत्यंत जोरदारपणे त्यांनी खोत यांचा निषेध नोंदवला.
राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्यावर अत्यंत संतापजनक पोस्ट टाकल्याप्रकरणी केतकी चितळेचा राज्यभर जोरदार निषेध व्यक्त होत आहे. सदर पोस्ट सोशल मीडियावर टाकल्याच्या प्रकरणी केतकी चितळेला पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने पोलीस कोठडी दिली आहे. अत्यंत विकृत आणि कुणालाही न पटणारी संतापजनक पोस्ट टाकून राज्यात संताप निर्माण केला आहे. सामान्य माणूस देखील या निज्ञ प्रकारामुळे व्यथित झाला आहे.
एरवी शरद पवार यांच्यावर टीका करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, माजी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी देखील या विकृत प्रकारावर प्रहार केला आहे. चित्रपट क्षेत्रातील अनेक कलावंतानी देखील केतकीच्या या पोस्टचा निषेध व्यक्त केला आहे परंतु सदाभाऊ खोत यांनी मात्र केतकी चितळेचे समर्थन केल्याच्या बातम्या येताच समाज निशब्द झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये तर संतापाची लाट उसळली असून त्याचा प्रत्यय सदाभाऊ खोत यांना देखील आला.
रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत हे आज सोलापूर येथे आले होते. यावेळी ते शासकीय विश्रामगृहात असताना राष्ट्रवादीचे तरुण कार्यकर्ते त्यांच्यावर चाल करून गेले. सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे सदर कार्यकर्ते हे टाळ मृदंग घेवून या ठिकाणी दाखल झाले होते. या ठिकाणी त्यांनी जोरदार राडा तर केलाच पण अत्यंत कडक शब्दात सदाभाऊ खोत यांचा निषेध देखील व्यक्त केला. कार्यकर्ते सदाभाऊ यांच्यावर चाल करून गेले तेंव्हा त्यांच्या सुरक्षा रक्षकाला कार्यकर्त्यांना रोखणे कठीण झाले होते. बराच वेळ विश्रामगृहात ही झटापट सुरु होती त्यामुळे शासकीय विश्रामगृहात एकच गोंधळ उडाला होता.
काय म्हणाले होते सदाभाऊ ?
राज्यभरातून केतकी चितळेचा निषेध आणि संताप व्यक्त होत असताना सदाभाऊ खोत यांनी केतकीचे कौतुक केले होते. "केतकी कणखर आहे. तिला समर्थन करण्याची कुणाची गरज नाही, तिला मानावे लागेल. न्यायालयात तिने स्वत:ची बाजू स्वत: मांडली, केतकीच्या पोस्टवर तुमच्या कार्यकर्त्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या होत्या ? हे धंदे आता बंद करा" ! असे खोत म्हणाले होते.
मी असे म्हणालोच नाही !
आज सोलापुरात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी राडा केल्यानंतर सदाभाऊ खोत यांनी आपण केतकी चितळेचे समर्थन केलेच नाही असे म्हटले आहे. केतकीने शरद पवार यांच्याबाबत केलेल्या पोस्टचे आपण समर्थन केले नसून न्यायालयात ती कणखरपणे उभी राहिल्याचे आपण सांगत होतो असे खोत म्हणाले.
भेदरले सदाभाऊ !
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अचानक चाल करून आल्याचे पाहताच सदाभाऊ खोत आणि त्यांच्या सोबत असलेले काही कार्यकर्ते भेदरलेल्या अवस्थेत दिसून आले. जोरदार घोषणा आणि आक्रमक कार्यकर्ते यामुळे शासकीय विश्रामगृहाचे वातावरण काही काळ तणावपूर्ण दिसत होते.
0 Comments