सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना! मुलं होत नसल्याने सासरच्यांनी केला छळ, सुनेची गळफास घेऊन आत्महत्या
मूलं होत नाही, तसेच त्यासाठी दवाखान्यात होणारा खर्च आई-वडिलांकडून घेऊन येण्यासाठी होणाऱ्या सासरच्यांच्या त्रासास कंटाळून विवाहितेने गळफास घेतल्याची घटना सासुरे (ता.बार्शी) येथे सकाळी घडली.
याबाबत पती आकाश तात्या गायकवाड, सासू लक्ष्मी तात्या गायकवाड आणि सासरे तात्या प्रल्हाद गायकवाड यांच्याविरोधात वैराग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत वैराग पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, 10 मार्च 2017 रोजी शितल आकाश गायकवाड हिचा विवाह आकाश तात्या गायकवाड (रा. सासुरे) याच्याशी झाला होता. सुरुवातीची दोन वर्ष सुखासमाधानाची गेली. मात्र त्यानंतर शितल हिला मूल होत नाही म्हणून सतत त्रास देण्यास सुरुवात झाली.
तसेच मूल व्हावे यासाठी तिच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते. तो खर्च माहेरकडून घेऊन ये, म्हणून पती आकाश, सासू लक्ष्मी तात्या गायकवाड आणि सासरे तात्या प्रल्हाद गायकवाड हे शारीरिक आणि मानसिक त्रास देत होते.याला कंटाळून शीतलने शनिवारी सकाळी राहत्या घरी पत्र्याच्या लोखंडी पाइपला गळफास घेतला. याप्रकरणी शितलच्या भावाने फिर्याद नोंदवली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे करीत आहेत.


0 Comments