यापुढे लाऊड स्पीकर लावण्यास पोलीस प्रशासनाची परवानगी आवश्यक : उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील
कायदा मोडणा-यांवर पोलिसाकडून कायदेशीर कारवाई केली जाईल : राजश्री पाटील
सांगोला (प्रतिनिधी) : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार यापुढे मंदिर, मस्जिद, चर्च, बौद्ध विहार, जैन मंदिर, समाज मंदिरावर ध्वनीक्षेपक (speaker) लावण्यासाठी पोलीस प्रशासनाची परवानगी आवश्यक आहे. आजान असो की धार्मिक कार्यक्रमांना सकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत न्यायालयाच्या निर्देशानुसार स्पीकर लावण्यास परवानगी असणार आहे. धार्मिक स्थळावर स्पीकर लावण्यावरून वाद निर्माण झाल्यास कोणी कोणाला मदत करण्याची गरज नाही त्यासाठी पोलिस यंत्रणा सक्षम आहे कोणीही कायदा हातात घेऊ नये तसे आढळून आल्यास संबंधितावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीमती राजश्री पाटील (Rajshree Patil) यांनी शांतता कमिटीच्या बैठकीत दिला.
राज्यात मंदिर मस्जिदवर भोंगे लावण्याच्या कारणावरून वाद झाल्याच्या पार्श्वभूमीवर सांगोला (Sangola) तालुका शांतता कमिटीची बैठक उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील व तहसीलदार अभिजीत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली या बैठकीस पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी हाजी शब्बीर भाई खतीब माजी नगरसेवक रफिक तांबोळी, सीए जुबेर मुजावर अस्मीर तांबोळी छोटू मुजावर तोहिद मुल्ला माजी पंचायत समिती सदस्य सुभाष इंगोले, संभाजी ब्रिगेडचे अरविंद केदार आरपीआयचे सुरज बनसोडे खंडू सातपुते बापूसाहेब ठोकळे माऊली तेली यांच्यासह सर्वधर्मीय समाज बांधव विविध गावचे पोलीस पाटील पत्रकार उपस्थित होते.
प्रास्ताविकात पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी म्हणाले, सांगोला तालुक्यात भोंगे, हनुमान चालीसा वाचनावरून समाजा समाजामध्ये कोणतीही धार्मिक तेढ निर्माण होवून गालबोट लागणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी. धार्मिक स्थळावर स्पीकर लावण्यासाठी आपआपल्या धार्मिक स्थळाची माहिती, कागदपत्रे अर्ज देऊन पोलीस प्रशासनाकडून रीतसर परवानगी घ्यावी. तालुक्यातील सुज्ञ नागरिकांनी नेहमीप्रमाणे कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून शांतता टिकवून ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे असे त्यांनी आवाहन केले.
यावेळी तहसीलदार अभिजीत पाटील, हाजी शब्बीरभाई खतीब संभाजी ब्रिगेडचे अरविंद केदार, सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब ठोकळे, आरपीआयचे नेते सुरज बनसोडे काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र कांबळे यांनी विचार व्यक्त केले आभार सहाय्यक फौजदार हनुमंत माळकोटगी यांनी मानले.
सांगोला एक संस्थान आहे. या संस्थानाची शांतता अबाधित ठेवण्यासाठी सर्व धर्मियांनी जातीय सलोखा ठेवण्याची गरज आहे नुकत्याच झालेल्या रमजान ईद बसवेश्वर जयंती शिवजयंती यामधून सांगोल्यात सर्व धर्मीय एकत्र येऊन सण उत्सव साजरे करतात याचा प्रत्यय आला आहे त्यामुळे नेहमी शांतता प्रिय असणारा सांगोला तालुका कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेऊन यापुढेही प्रशासनास सहकार्य करतील असा विश्वास तहसीलदार अभिजित पाटील यांनी यावेळी दिला.


0 Comments