सोलापूर : आजीच्या देखभालीस आलेल्या मुलीची कथा ! १४ व्या वर्षी पहिले बाळ अन् १५ व्या वर्षी पुन्हा गर्भवती
सोलापूर : खेळण्या-बागडण्याच्या वयात समोरील तरुणाच्या आमिषाला बळी पडलेल्या मुलींवर अल्पवयातच सांसारिक जबाबदारी येऊ लागली आहे. वळसंग पोलिसांत दाखल एका गुन्ह्यातील अल्पवयीन मुलगी गावातील एका तरुणासोबत पळून गेली.
वयाच्या १४ व्या वर्षीला तिला बाळ झाले. नोव्हेंबर २०१९ रोजी पळून गेलेली मुलगी पोलिसांना मागील महिन्यात मध्यप्रदेशात सापडली. तिची वैद्यकीय चाचणी केली, त्यावेळी ती पुन्हा अडीच महिन्यांची गर्भवती निघाली
उदरनिर्वाहासाठी आई-वडील दुसऱ्या जिल्ह्यात गेले होते. दरम्यान, त्या मुलीची आजी आजारी असल्याने तिच्या देखभालीसाठी पालकांनी तिला मूळगावी पाठविले. त्यावेळी तिचे वय १४ वर्षे होते. त्याचवेळी गावातील एका तरुणाशी तिची ओळख झाली आणि दोघांचे भेटणे सुरू झाले.
चोरून भेटणे-बोलणे सुरूच होते, पण त्यांनी पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. मुलगा मजुरी करीत होता. त्याचीही परिस्थिती जेमतेमच होती. त्याने पाच हजार रुपयांची जुळवाजुळव केली आणि नोव्हेंबर २०१९ रोजी त्यांनी रेल्वेने मुंबई गाठली. दोन दिवस मुंबई रेल्वे स्थानकावर काढले आणि त्यानंतर ते दोघेही एका रेल्वेत बसले. दोन-तीन दिवसांच्या प्रवासानंतर ते मध्य प्रदेशातील सताना येथे पोचले.
खिशातील पैसे संपत असल्याची त्यांना चिंता होती. त्यामुळे अंगात त्राण आहे, तोवर त्यांनी तब्बल ३० किलोमीटरचे अंतर पायी पार केले. त्यांनी एक खोली भाड्याने घेतली आणि तो मुलगा त्या ठिकाणी काम शोधू लागला. परराज्यातून आलेल्या तरुणाला नोकरीही मिळेना, खिशातील पैसेही संपले होते. त्या तरुणाला तेथील दोघांचा मारदेखील खावा लागला होता. मुलीला परत जाताही येत नव्हते.
पोलिसांचा तपास सुरूच होता, पण ते सापडत नव्हते. हा गुन्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी अनैतिक मानवी प्रतिबंधक कक्षाकडे वर्ग केला आणि पोलिस निरीक्षक गोरख गायकवाड यांनी व त्यांच्या पथकाने त्या दोघांचा शोध घेतला. त्यावेळी त्या दोघांना दहा महिन्यांचे बाळ झाले होते. त्यासंदर्भात आणखी कठोर पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे.
तीन-तीन दिवस पाणी पिऊनच काढले
खिशात दमडाही नाही, हाताला काम मिळत नव्हते. मुलगी गर्भवती असतानाही त्याचा नाईलाजच होता. त्यांनी तीन-तीन दिवस उपाशीपोटी काढले. गर्भवती तरुणीला घरमालकिणीने जेवायला दिले. तसेच तिचे बाळंतपणदेखील त्याच महिलेने केले होते. सध्या तो मुलगा पोक्सो गुन्ह्यात कोठडीत आहे. मुलीला तिच्या पालकांनी घरी नेले आहे.
मुलींनी शिक्षणालाच द्यावे प्राधान्य
आधुनिक काळात सध्या प्रत्येक क्षेत्रात मुली पुरुषांबरोबर काम करीत आहेत. मुलींना शिक्षणाच्या जोरावर नोकरीच्या अनेक संधी आहेत. शारीरिक बदल समजून घेऊन मुलींनी त्या वयात कोणताही वाईटविचार मनात न आणता शिक्षणावरच फोकस करावा; जेणेकरून तिला व तिच्या आई-वडिलांना समाजात मान खाली घालायची वेळ येणार नाही. पालकांनीही मुलांशी विशेषत: मुलींशी सुसंवाद ठेवून त्यांच्या अडचणी वेळोवेळी जाणून घ्यायला हव्यात, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मत आहे.


0 Comments