राज्यातील दारुची दुकानेही बंद होणार..? आरोग्यमंत्री टोपे यांचे महत्वपूर्ण विधान..!
राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली. त्यात ओमायक्रॉनचा कहर सुरू झाल्याने, ठाकरे सरकारने आज (ता. 9) मध्यरात्रीपासून कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 15 फेब्रुवारीपासून शाळा-महाविद्यालयांसह स्विमिंग पूल, जीम, स्पा पूर्णपणे बंद राहतील.
शॉपिंग मॉल, मैदाने, उद्याने, चित्रपटगृहे, केश कर्तनालयासाठी कडक नियमावली करण्यात आली आहे. मात्र, या नियमावलीत दारुच्या दुकानांबाबत काहीही म्हटलेले नाही. त्यामुळे ठाकरे सरकारच्या या निर्णयाबाबत सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणात टीका होत होती. अखेर त्यावर आराेग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्टीकरण दिले आहे..
टोपे काय म्हणाले..?
जालना येथे माध्यमांशी बोलताना मंत्री टोपे यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, की “दारुच्या दुकानांमध्ये गर्दी होत असल्याचे आढळून आल्यास, दारुची दुकानेही बंद केली जातील. तसाच निर्णय लग्न सोहळा व धार्मिक स्थळांबाबतही घेण्यात येईल. एकाच वेळी नागरिकांनी गर्दी करु नये. मंदिरे बंद केलेली नाहीत, पण सामाजिक अंतर पाळलं जावं..!”
शाळा बंद ठेवण्यात आल्या, मात्र दारुची दुकाने सुरु असल्याने विरोधकांकडून टीका होत असल्याची बाब लक्षात आणून दिल्यावर ते म्हणाले, की “गर्दी होत असेल, तर दारुची दुकानंही बंद करावी लागतील. त्याचबरोबर धार्मिक स्थळांमध्येही गर्दी झाल्यास त्याबाबतही टप्प्या-टप्याने निर्णय घेण्यात येईल..!”
आता नवे निर्बंध नाही..
“राज्यात कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे नव्याने निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्यात ऑक्सिजनची मागणी वाढेपर्यंत, तसेच हॉस्पिटलमध्ये बेड्स कमी पडत नाही, तोपर्यंत आणखी नवे निर्बंध लावले जाणार नाहीत,” असेही टोपे यांनी स्पष्ट केले..
मुलांना मधुमेहाचा धोका..
ते म्हणाले, की “18 वर्षांवरील कोरोनाबाधित मुलांना मधुमेह होण्याचा धोका वाढला, असा अहवाल समोर आला आहे. याबाबत ‘आयसीएमआर’ने सूचना केल्यास त्याची अंमलबजावणी केली जाईल.” मुंबईतील कोविड सेंटरमध्ये पारदर्शकता नसल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केल्याचे निदर्शनास आणून दिले असता, तक्रारीनंतर पारदर्शक चौकशी करून कारवाई केली जाईल, अशी ग्वाही टोपे यांनी दिली.
0 Comments