सोलापूर : कोरोनात पोटभर अन्नासाठी सर्वसामान्यांचा संघर्ष !
सोलापूर : शहरातील बेशिस्त वाहनचालकांना स्वयंशिस्त लागावी, रस्ते अपघात कमी व्हावेत, वाहतूक सुरळीत व्हावी या हेतूने शहर पोलिस आयुक्तालयाकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे.
दुसऱ्या दिवशी 410 वाहनांवर कारवाई करण्यात आली. 36 वाहने आरटीओकडे (RTO) जमा करण्यात आली असून 370 वाहनांकडून एक लाख 84 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. शहरातील रस्ते उखडलेले असून रस्त्यांवर खड्डेच खड्डे झाले आहेत.
पार्किंगसाठी पुरेशी जागाच नाही, शहरातील महापालिकेची परिवहन मोडकळीस आली आहे. अशातच कोरोनाचा जोर पुन्हा वाढू लागला आहे. तरीही, पोलिसांकडून दंडात्मक कारवाई सुरु असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे.
शहरात प्रवेश करतानाच जुना पुना नाका, छत्रपती शिवाजी महाराज चौक, जुना एम्प्लॉयमेंट चौक, सैफूल, पोटफाडी चौक, जुना अक्कलकोट नाका, प्रियंका चौक, सरस्वती चौक, गांधी नगर, पत्रकार भवन, महिला हॉस्पिटल, कन्ना चौक, मार्केट यार्ड, चेतन हॉटेल या ठिकाणी कारवाई करण्यात आली. प्रत्येक तासाला पोलिसांनी कारवाईचे ठिकाण बदलून बेशिस्त वाहनांवर दंडात्मक कारवाई केली.
बेशिस्त वाहनचालकांना त्याठिकाणी कारवाई सुरु आहे म्हणून समजल्यानंतर ते रस्ता बदलून जातात म्हणून ठिकाणात सातत्याने बदल केला जात आहे. बेशिस्त वाहनचालकांना स्वयंशिस्त लागेपर्यंत कारवाई सुरु ठेवली जाईल,
असे पोलिस आयुक्तालयाकडून सांगण्यात आले. दरम्यान, कोरोनाचे संकट पुन्हा जोर धरु लागले आहे, अशा कठीण काळात पोटभर अन्नासाठी नागरिकांची धडपड सुरु असून दोन वर्षांपासून कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी त्यांचा संघर्ष सुरु आहे. अपघात होऊ नयेत म्हणून बेशिस्तांनी वाहतुकीचे नियम तंतोतंत पाळायला हवेत.
कारवाई करुनही बेशिस्तांचे प्रमाण लक्षणीय आहे. परंतु, खरोखरच जे मुजोर आहेत, ज्यांना वारंवार सांगूनही दंड करूनही फरक पडलेला नाही, अशा बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई जरूर करावी. मात्र, छोटे-छोटे कारण पुढे भरमसाठ दंड, किमान अशा संकट काळात तरी घेऊ नये, असाही सूर उमटू लागला आहे.
कारवाईतील ठळक बाबी...
बुधवारी (ता. 5) कारवाई करताना पोलिसांनी चारवेळा बदलले ठिकाण
कारवाईसाठी वाहतूक शाखा, पोलिस ठाणे, पोलिस मुख्यालय आणि आरसीपी पथकाचे कर्मचारी
कारवाईच्या दुसऱ्या दिवशी (बुधवारी) 244 वाहने केली जमा; 410 पैकी 370 वाहनचालकांनी जागेवर भरला दंड
एकाच दिवशी सव्वातीन लाखांचा दंड वसूल; हेल्मेट, वाहन परवाना व विमा, आरसीबूक, पीयुसी नसलेली वाहने टार्गेट
वाहनाचालकांनी पाळावेत हे नियम...
दुचाकीवरुन जाताना दोघांनीही हेल्मेटचा वापर करावा
चारचाकी चालविताना चालकासह सर्वांनीच सीटबेल्टचा करावा वापर
विरुध्द दिशेने वाहन चालवू नये, वाहनाचा वेग मर्यादित ठेवावा
मोबाईलवर बोलत अथवा मद्यपान करून वाहन चालवू नये
18 वर्षे पूर्ण झालेल्यांनीच वाहन चालवायला हवे, विनापरवाना वाहन चालवू नये

0 Comments