सांगोला ग्रामीण रुग्णालयाचा गलथान कारभार उघड ; कोरोना रुग्णावर अंत्यसंस्कार , मात्र मृत्यूची नोंद नाही !
सांगोला/प्रतिनिधी ;- मुळचा भिकवडी बु.ता.खानापूर (विटा) जि.सांगली येथील भगवान मारुती मंडले वय वर्षे ५३ हा रोजंदारी निमित्ताने मुरुड (लातूर) येथे असताना त्यांचा दि.०२/०५/२०२१ रोजी कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर दि.०८/०५/२०२१ सदर व्यक्तीच्या नातेवाईकांनी त्यांना पुढील उपचारासाठी मुरूड येथून इस्लामपूर येथे घेवून जात आसताना सांगोला शहरातील आल्यानंतर त्या कोरोना रुग्णाची (भगवान मारुती मंडले) रक्ताची उलटी झाल्याने त्यांना दि.८/५/२०२१ रोजी सायंकाळी १० चे सुमारास त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना सांगोला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी घेवून गेले होते.
त्यावेळी ग्रामीण रूग्णालयाच्या डॉक्टरांनी तपासून ते मयत झाले असल्याचे घोषित केले .भगवान मारुती मंडले हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याने सदर व्यक्तीचा मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यास नकार देऊन कोरोनाचे नियमानुसार भगवान मारुती मंडले यांचेवर दि.०८/०५/२०२१ रोजीच ११;३० चे सुमारास सांगोला येथील स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. परंतु सदर कोरोना पॉझिटिव्ह भगवान मारुती मंडले यांच्या मृत्यूची नोंद सांगोला ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले नाही.
त्यामुळे मयत भगवान मारुती मंडले यांचे नातेवाईकांना शासनाकडून मिळणाऱ्या सानुग्रह अनुदानापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. मयत भगवान मारुती मंडले यांचे नातेवाईकांनी अनेक वेळा मृत्युच्या दाखल्याची मागणी करण्यासाठी सांगोला ग्रामीण रुग्णालय येथे व सांगोला नगरपालिका येथे येऊन मृत्युच्या दाखल्याची मागणी केली असता त्यांना गेल्या ७ महिन्यापासून मृत्यूचा दाखला देण्यात आलेला नाही.त्यामुळे सांगोला ग्रामीण रुग्णालयाचा गलथान कारभार उघड झाला आहे.
कोरोना सारख्या संवेदनशील विषयाबाबत सांगोला ग्रामीण रुग्णालय किती असंवेदनशील आहे. हे या प्रकारामुळे उघड झाले आहे. तरी गंभीर विषयाबाबत वरिष्ठ अधिकारी यांनी तातडीने दखल घेऊन सदर प्रकरणात जबाबदारी निश्चित करून योग्य ती कारवाई करण्यात यावी व शासनाच्या मिळणाऱ्या सानुग्रह अनुदानाचा लाभ घेण्यासाठी कोरोना पॉझिटिव्ह मयत व्यक्तीच्या नातेवाईकांना मृत्यूचा दाखला देण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे

0 Comments