पहिलीपासूनची शाळा सुरु करण्यास टास्क फोर्सचा 'लाल बावटा' !
पंढरपूर : राज्यातील पहिलीपासूनच्या शाळा लवकरच सुरु होण्याची चर्चा सुरु असतानाच टास्क फोर्सकडून मात्र लाल बावटा दाखविण्यात आल्याने हे वर्ग लवकर सुरु होण्याची शक्यता मावळली आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या पावणे दोन वर्षांपासून मंदिरापासून शाळेपर्यंत सगळीकडेच कुलूप लागलेले होते पण आता यातील एकेक दरवाजे उघडणे सुरु आहे. त्यामुळे शाळांच्या घंटाही आता पुन्हा वाजू लागतील अशी अपेक्षा असतानाच टास्क फोर्सकडून व्यक्त करण्यात आलेल्या मतामुळे पहिलीपासूनचे वर्ग सुरु होणार नाहीत असेच संकेत मिळाले आहेत. शहरी भागात आठवी ते बारावीचे वर्ग आणि ग्रामीण भागात पाचवी ते बारावी हे वर्ग सुरु झाले आहेत पण पहिली ते पाचवी वर्गाचे दरवाजे अजूनही बंद आहेत. हे वर्ग सुरु करावेत अशी मागणी आता पालकही करू लागले असून लहान मुलांना शाळांचा विसर पडू लागला असून शाळेची सवयही मोडली गेली आहे.
राज्य शासनाकडून पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग सुरु करण्याबाबत अनुकूलता दाखविण्यात येत असली तरी आत्तापर्यंत शासनाने राज्याच्या टास्क फोर्सच्या मतांवरच निर्णय घेतले आहेत आणि पहिलीपासूनचे वर्ग सुरु करण्यास टास्क फोर्सने प्रतिकूल मत व्यक्त केले आहे. विद्यार्थ्यांचे लसीकरण झाल्याशिवाय शाळा सुरु करणे योग्य होणार नसल्याचे टास्क फोर्स प्रमुख डॉ. संजय ओक यांनी सांगितले आहे. राज्य सरकारलाही ते याबाबत तशी विनंती करणार आहेत त्यामुळे पहिलीपासूनचे वर्ग सुरु होण्याची शक्यता मावळली असल्याचे दिसत आहे.
जवळपास अठरा महिने मुले शाळेच्या बाहेर आहेत आणि त्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची पूर्ण कल्पना आहे परंतु लहान मुलं कोरोनाला बळी पडणार नाहीत याची काळजी टास्क फोर्सला आहे. त्यासाठीच पीडियाट्रिक व्हॅक्सिनेशन सुरु करण्यात यावं यासाठी टास्क फोर्स सोमवारी मिटिंगमध्ये राज्य शासनाला विनंती करणार आहे. विद्यार्थ्यांचं लसीकरण होत नाही तोपर्यंत शाळा सुरु करणं योग्य ठरणार नाही, शाळा लवकर सुरु करायच्या असतील तर लहान मुलांचं लसीकरण होणे आवश्यक आहे, केंद्र सरकारनं लहान मुलांचं लसीकरण सुरु करावं असेही डॉ. संजय ओक यांनी सांगितले आहे.
तिसऱ्या लाटेचा धोका !
कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात कमी झालेला असल्याने नागरिकात बेपर्वाई दिसून येत आहे. कोरोना समूळ नष्ट झाल्यासारखे लोकांचे वागणे पहायला मिळत आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेची चर्चाही आता विरली असून लोक भयमुक्त झाले आहेत पण डॉ. ओक यांनी याबाबत महत्वाचे भाष्य केले आहे. "सणासुदीच्या दिवसात लोकांनी मास्क वापरणे टाळले पण यामुळेच तिसरी लाट येणारच नाही असे म्हणता येणार नाही, अमेरिकेत मुलांचे बाधित होण्याचे प्रमाण इतके वाढले की मुलांना एका राज्यातून दुसऱ्या राज्यात हलवावे लागत आहे. अशी परिस्थिती मला माझ्या राज्यात येऊ द्यायची नाही, तिसरी लाट येण्याबाबतचा अंदाज चुकला याचा आनंदच आहे पण तिसरी लाट येणारच नाही असे मात्र म्हणता येत नाही" असे डॉ. संजय ओक यांनी सांगितले आहे
0 Comments