जेवायला बोलावून कापले गुप्तांग आणि गेले पळून !
अक्कलकोट : एका बत्तीस वर्षाच्या व्यक्तीला मारहाण करून त्याचे गुप्तांग कापून टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून दुसऱ्या दिवशी ही बाब निदर्शनास आली आहे.
याबाबत मेह्बूब सैफन कलबुर्गी या इंडी तालुक्यातील तडवळगा येथील व्यक्तीने पोलिसात फिर्याद दिली असून त्यानुसार कलबुर्गी हे स्वतः जखमी असून त्याच्यावर सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मुन्ना चांदसाब पटेल, अब्दुल हमीदनजीर मुल्ला हे दोघे विजयपूर येथून मोटारसायकलवरून कलबुर्गी यांच्या घराजवळ आले आणि त्यांनी कलबुर्गी यांना ढाब्यावर जेवायला जाऊ असे सांगितले. त्यानुसार हे तिघे मणूर गावाजवळ आले. येथे ते पोहोचल्यानंतर आणखी एक मित्र तेथे पोहोचला. अक्कलकोट तालुक्यातील करजगी येथील हुसेन नबीलाल तोडगी तेथे आल्यानंतर पुढचे नाट्य सुरु झाले. मित्राची गाडी कडबगावजवळ खराब झाल्याचे कारण सांगून कलबुर्गी यांना तिकडे नेले. तेथे गेल्यावर मात्र तिघांनी मिळून कलबुर्गी यांना बेदम मारहाण सुरु केली. शिवीगाळ करीत लाथा बुक्क्यांनी मारहाण तर केलीच पण ठार मारण्याच्या हेतूने बिअरच्या बाटलीने डोक्यात मारले.
तिघांनी कलबुर्गी यांना बेदम मारूनही तेवढ्यावर ते थांबले नाहीत तर ब्लेडने त्यांचे गुप्तांग कापले आणि तिघेही तेथून पळून गेले. गुप्तांग कापल्याने कलबुर्गी गंभीर जखमी झाले होते. रक्ताळलेल्या अवस्थेत ते बेशुद्ध पडले आणि रात्रीच्या वेळेमुळे हे कुणाच्याच लक्षात आले नाही. दुसऱ्या दिवशी ते शुद्धीवर आल्यावर त्यांनी दुसऱ्यांच्या मोबाईलवरून आपल्या नातेवाईकांना या घटनेबाबत माहिती दिली. त्यानंतर नातेवाईक आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले. कलबुर्गी यांना सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. कलबुर्गी यांची फिर्याद घेतल्यानंतर पोलिसांनी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करून आरोपींना ताब्यात घेतले आहे. हा प्रकार कशासाठी झाला याचा अद्याप उलगडा झाला नसून पोलीस अधिक तपास करीत आहेत. संपूर्ण अक्कलकोट तालुक्यात या घटनेची चर्चा सुरु झाली आहे.
0 Comments