google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सण , उत्सवांच्या काळात सोलापूर विभागातील अनेक रेल्वेगाडय़ा रद्द ; प्रवाशांमधून संताप

Breaking News

सण , उत्सवांच्या काळात सोलापूर विभागातील अनेक रेल्वेगाडय़ा रद्द ; प्रवाशांमधून संताप

 सण , उत्सवांच्या काळात सोलापूर विभागातील अनेक रेल्वेगाडय़ा रद्द ; प्रवाशांमधून संताप


मध्य रेल्वे सोलापूर विभागाने ऐन सणाच्या तसेच उत्सवाच्या काळात सोलापूर विभागातून धावणाऱया अनेक रेल्वेगाडय़ा रद्द केल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांतून संताप व्यक्त होत आहे.रद्द करण्यात आलेल्या गाडय़ा लवकरात लवकर सुरू कराव्यात, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.


सोलापूर विभागातील दौंड-कुर्डुवाडी सेक्शनमधील भाळवणी ते वाशिंबे स्थानकादरम्यानच्या दुहेरीकरणासाठी 14 ते 28 ऑक्टोबर या कालावधीत सोलापूर-मुंबई सिद्धेश्वर एक्प्रेस, सोलापूर-पुणे हुतात्मा एक्प्रेस यासह 16 गाडय़ा रद्द केल्या आहेत. सध्या दिवाळी सण, उत्सवाचा काळ आहे. या सण, उत्सवाच्या काळात अनेक कुटुंबे आपल्या घराकडे उत्सव साजरा करण्यासाठी येतात. मुंबई तसेच पुण्याहून सोलापूरकडे येणारे तसेच जाणाऱया प्रवाशांची मोठी संख्या आहे. त्याचबरोबर हैदराबाद, गदग, बंगळुरू आदी ठिकाणीही प्रवासी मोठय़ा संख्येने प्रवास करतात.


गेल्या वर्षी कोरोनामुळे अनेक रेल्वेगाडय़ा बंदच होत्या. पॅसेंजर गाडय़ा तर अद्यापही सुरू झालेल्या नाहीत. इतर अनेक गाडय़ा बंद आहेत. गेल्या वर्षी कोरोनाचा कठीण काळ असल्याने अनेकांनी दसरा, दिवाळी हे सण साधेपणाने साजरे केले. यंदाच्या वर्षीही तीच परिस्थिती होती. मात्र, जुलैनंतर कोरोनाचा संसर्ग कमी झाला. रेल्वेनेही काही मार्गावरील गाडय़ा पुन्हा सुरू केल्या. हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत आहे.


यंदाच्या वर्षीचा ऑक्टोबर व नोव्हेंबर महिना हा सण, उत्सवाचा महिना आहे. या सणाच्या काळात प्रवासासाठी अनेकांची पसंती रेल्वेला असते. गेल्या वर्षी कोरोनामुळे अनेकांना आपले कुटुंबीय तसेच नातेवाईकांकडे जाता आले नाही. यंदाच्या वर्षी सणात ही संधी आली, मात्र मध्य रेल्वे सोलापूर विभागाने दुहेरीकरणाच्या कामांसाठी ऐन सणासुदीच्या काळातच अनेक रेल्वेगाडय़ा रद्द केल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना इतर खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे.


रेल्वे प्रशासनाने सोलापूरकरांसाठी महत्त्वाच्या असणाऱया गाडय़ा 28 ऑक्टोबरपर्यंत रद्द केल्या आहेत. तरी रद्द करण्यात आलेल्यांपैकी काही प्रमुख गाडय़ा तरी सुरू कराव्यात, अशी मागणी प्रवाशांतून व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments