सांगोला तालुक्यातील एकही गाव पाण्यावाचून वंचित राहणार नाही.पाणी पुरवठामंत्री गुलाबराव पाटील
राजकारणात कोणाला पाणी पाजायचं असेल, तर आपल्याकडं पाणी असावं लागत
सांगोला (जि. सोलापूर) : राजकारणी खरे नटसम्राट असतात. त्यांना सर्व प्रकारच्या भूमिका पार पाडाव्या लागतात. त्यांना प्रत्येकाच्या सुख-दुःखात, त्याचबरोबर सामाजिक कामातही सहभागी व्हावे लागते. शिवसेनेमध्ये सामाजिक कामांना नेहमीच प्राधान्य दिले जाते. त्यामुळेच आज एक पानटपरीवाला शिवसेनेच्या माध्यमातून मंत्री होतो. राजकारणात कोणाला पाणी पाजायचे असेल, तर आपल्याकडे पाणी असावे लागते. बापू, तुम्ही काळजी करू नका, हा पाणीपुरवठा मंत्री तुमच्या पाठीशी आहे. सांगोला तालुक्यातील एकही गाव पाण्यावाचून वंचित राहणार नाही. तालुक्यातील 81 गावांची पाणीपुरवठा योजना यापुढेही सुरु राहणार असल्याची ग्वाही पाणी पुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी (ता. 14 ऑक्टोबर) सांगोला येथे शिवसैनिकांना बैठकीत मार्गदर्शन करताना पाणीपुरवठा मंत्री पाटील बोलत होते. या वेळी मंत्री पाटील व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आमदार शहाजीबापू पाटील यांचा सत्कार करण्यात आला .पाटील म्हणाले की, तीनही पक्षाच्या लोकांची महाविकास आघाडीची गाडी सध्या सुसाट आहे. ही महाविकास आघाडीचे सरकार आपला कार्यकाल पूर्ण करेल. आज-काल कोणी मंत्री, आमदार, खासदार जास्त बोलू लागला की त्याच्यामागे ईडीची चौकशी लागते. चौकशी करायला काहीच हरकत नाही; परंतु कोणी जास्त मालमत्ता मिळवली, त्या सर्वांचीच चौकशी झाली पाहिजे.
0 Comments