जालना , 12 जून : मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन पतीपासून विभक्त राहणाऱ्या महिलेचं जबरदस्तीने लग्न लावून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे . लग्न झाल्यानंतर पीडित महिलेनं पुणे पोलिसांत धाव घेत फिर्याद दाखल केली आहे . पुणे पोलिसांनी विविध कलमांतर्गत सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे .
याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसून घटनेचा तपास केला जात आहे .मिळालेल्या माहितीनुसार , पीडित महिलेचं काही वर्षांपूर्वी पुण्यातील वडगाव शेरी येथील रहिवासी असणाऱ्या एका युवकाशी लग्न झालं होतं . काही दिवस आनंदात गेल्यानंतर पतीच्या दारुच्या व्यसनामुळे तिचं आपल्या पतीसोबत खटके उडू लागले . त्यामुळे तिने आपल्या पतीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला . तिला पहिल्या पतीपासून एक मुलगीही झाली होती . पीडित महिला आपल्या मुलीसोबत एकटी पुण्यात राहात होती . दरम्यान भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील रहिवासी असणाऱ्या गोपाळ प्रकाश शिरसाट याने संबंधित महिलेला बळजबरी गावी आणलं . याठिकाणी मुलीला जीवे मारण्याची धमकी देत पीडितेचं अमोल शिरसाट नावाच्या व्यक्तीशी जबरदस्तीने लग्न लावू दिलं . या संतापजनक प्रकारानंतर पीडित महिलेनं पुणे पोलिसांत तक्रार दाखल केली . पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतल्यानंतर हे प्रकरण पारध पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला . याप्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पण पारध पोलिसांनी अद्याप एकाही आरोपीला अटक केली नाही . या घटनेची चौकशी केली जात असून लवकरच आरोपींना गजाआड केलं जाईल , असं आश्वासन पोलिसांकडून देण्यात आलं आहे . या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे .
0 Comments