गणपतराव देशमुखांच्या वारसाची सांगोल्यात पुन्हा चर्चा; नातवाने मांडली ही भूमिका... शेतकरी कामगार पक्षाच्या गावोगावच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.
सांगोला (जि. सोलापूर) : माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे नातू आणि सध्या पश्चिम बंगालमध्ये शिक्षण घेत असलेले डॉ. बाबासाहेब देशमुख सांगोल्यात आल्यावर दोन दिवस त्यांना भेटण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या गावोगावच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. या वेळी डॉ. देशमुख यांनी जरी मी अजून राजकारणात येण्याचा निर्णय घेतला नसल्याचे सांगत असले तरी दोन दिवस कार्यकर्त्यांच्या वाढत्या गराड्यामुळे पुन्हा एकदा माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या वारसदाराची चर्चा रंगू लागली आहे. शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि विक्रमी वेळा आमदार झालेले माजी आमदार गणपतराव देशमुख यांनी 2019 ची विधानसभा निवडणूक वयामुळे लढवली नव्हती. त्यामुळे त्यांच्या वारसाची चर्चा त्यावेळी मोठ्या प्रमाणात रंगली होती.विधानसभेच्या ऐन निवडणुकीच्या तोंडावर शेकापतर्फे माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख यांना उमेदवारी दिली होती. त्या निवडणुकीत अनिकेत देशमुख यांचा अल्पशा मताने पराभव झाला होता. या ठिकाणी शिवसेनेचे शहाजी पाटील विजयी झाले होते. निवडणुकीनंतर डॉ. अनिकेत देशमुख हे राजकारणात तेवढेसे सक्रीय राहिलेले दिसत नाहीत. त्यामुळे कार्यकर्त्यांना शेकापच्या वारसाची चिंता लागून राहिली होती. पण, पश्चिम बंगालमध्ये डॉक्टरकीचे शिक्षण घेत असलेले माजी आमदार देशमुख यांचे नातू डॉ. बाबासाहेब देशमुख हे गेल्या दोन दिवसांपासून सांगोल्यात आले आहेत. त्यांना भेटण्यासाठी तालुक्यातील गावोगावच्या शेकापच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. शहर व तालुक्यातील प्रमुख नेतेमंडळी व कार्यकर्त्यांनी या वेळी बाबासाहेबांना सक्रीय राजकारणात सहभागी होण्याचा आग्रह करीत असल्याचे दिसून आले. डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी लॉकडाउनच्या काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगोला तालुक्यातील जनतेशी मोठ्या प्रमाणात संवाद चालला होता. तसेच, येथील वैद्यकीय समस्या जाणून घेऊन त्या सुधारण्यासाठी व पूर्ण करण्यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांशी संपर्कात राहिले होते. ग्रामपंचायत निवडणुकीच्या वेळी विविध गावच्या नेतेमंडळींना व कार्यकर्त्यांना ते स्वतः फोन करून निवडणुकीची माहिती व गावातील राजकीय व सामाजिक समस्यांबाबत चर्चा करीत होते. त्यामुळे पुढच्या राजकारणात डॉ. बाबासाहेब देशमुख हे सक्रीय राजकारणात सहभागी होतात का? याकडे शेकापच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. जूननंतर आबासाहेबांच्या सेवेत सांगोल्यात असणार आहे सांगोला तालुक्यातील राजकारणात सक्रिय होण्याचा अजून माझा कोणताही निर्णय झाला नाही. परंतु जून महिन्यानंतर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आबासाहेबांच्या (गणपतराव देशमुख) सेवेशी मी सांगोल्यात असणार आहे. राजकारणाबरोबरच इतर क्षेत्रात राहूनही समाजसेवा करता येऊ शकते. राजकारणात आलो नाही तरी समाजसेवा करीत राहीन, असे माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी सांगितले.
0 Comments