सांगोला ( सोलापूर ) : आमदार शहाजीबापू पाटील यांनी शेकापचे ज्येष्ठ नेते माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली . ही भेट माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी घेतल्याचे सांगितले जात असले , तरी आगामी नगरपालिका , जिल्हा परिषद , पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीमुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे .
राज्याप्रमाणेच सांगोल्यातही शेकाप महाविकास आघाडीत सामील होणार का , असा प्रश्न या भेटीने उपस्थित होत आहे . दोनच दिवसांपूर्वी आमदार शहाजीबापू पाटील , माजी आमदार व राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष दीपक साळुखे पाटील , काँग्रेसचे पी . सी . झपके यांच्यामध्ये आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात महाविकास आघाडीच्या माध्यमातून चर्चा झाली होती . ही निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्रित लढविण्याबाबत ठरल्याचे सांगितले होते . त्यानंतर दोनच दिवसांनंतर गुरुवारी ( ता . 25 ) शहाजीबापू पाटील हे माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी त्यांना भेटले . या वेळी त्यांच्यासमवेत माजी नगराध्यक्ष रफिक नदाफ होते . ही बैठक झाल्यानंतर त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकजणांच्या वेगवेगळ्या कमेंट येऊ लागल्या . त्यामुळे ही नेमकी भेट प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी होती की अजून नवीन राजकीय समीकरणे बांधण्यासाठी होती ? याबाबत सर्वत्र चर्चा रंगत असताना , भेटीचे नेमके कारण मात्र गुलदस्त्यातच राहिले आहे सांगोल्यात महाविकास आघाडीत शेकापही ? राज्यात महाविकास आघाडीमध्ये शेकापही आहे . सांगोल्यातील स्थानिक राजकारणामुळे सध्या शेकाप व महाविकास आघाडी वेगळी असल्याचे सध्याच्या राजकीय परिस्थितीवरून दिसून येते . परंतु , येणाऱ्या विविध निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याप्रमाणेच सांगोल्यातही शिवसेना , राष्ट्रवादी काँग्रेस , काँग्रेस व शेतकरी कामगार पक्ष महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र येतील का , असा प्रश्न या आजा - माजी आमदारांच्या भेटीमुळे समोर येत आहे .असा प्रश्न या आजी - माजी आमदारांच्या भेटीमुळे समोर येत आहे . आमची भेट ही फक्त आबासाहेबांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठीच होती . परंतु राज्यातील महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेला शेकाप सांगोल्यातही महाविकास आघाडीत सामील होत असल्यास त्यांचे योग्य सन्मान देऊन स्वागत केले जाईल . तसे होत असल्यास सर्व घटक पक्षांना एकत्रित आणण्यात मी पुढाकार घेईन -शहाजीबापू पाटील , आमदार ,
0 Comments